Maharashtra Government New Scheme Update 2026 | राज्यातील लाडक्या बहिणी आणि बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पैशांची प्रतीक्षा राज्यातील जनता करत होती, ती प्रतीक्षा आता संपणार आहे. राज्य सरकारच्या तिजोरीतून लवकरच कोट्यवधी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ‘खटाखट’ जमा होणार असून, यामध्ये महिलांना तीन महिन्यांचा हप्ता तर शेतकऱ्यांना दोन हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे.
बहिणींच्या खात्यात येणार तीन हप्ते
राज्यातील सव्वादोन कोटी महिलांना डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात प्रलंबित असलेले तीन हप्ते म्हणजेच एकूण ४५०० रुपये जमा होऊ शकतात. सरकारने सध्या ई-केवायसी (e-KYC) पडताळणीची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अपात्र महिलांची नावे वगळली जात असून, १ एप्रिल २०२६ पासून केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या पदरात पडणार ६ हजार रुपये
केवळ महिलाच नव्हे, तर शेतकरी राजासाठीही आनंदाची बातमी आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकार जो नमो शेतकरी सन्मान निधी देतं, त्याचे प्रलंबित दोन हप्ते (आठवा आणि नववा) एकत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारचे ४ हजार आणि केंद्राचा २२ वा हप्ता असे मिळून मोठी रक्कम जमा होणार आहे. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९१ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना फेब्रुवारीअखेर हा लाभ दिला जाईल.
निधीची जुळवाजुळव सुरू
या दोन्ही योजनांच्या लाभासाठी राज्य सरकारला सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. अर्थ विभागाने अद्याप याला अधिकृत मंजुरी दिली नसली तरी, मंत्रालय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. ई-केवायसीमुळे लाभार्थींची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याने सरकारची दरमहा १६३५ कोटी रुपयांची बचत होत आहे, ज्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंत पैसे पोहोचवणे सोपे होणार आहे.
एकीकडे महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं असताना, ऐन होळी-रंगपंचमीच्या तोंडावर मिळणारी ही ओवाळणी आणि सन्मान निधी खऱ्या अर्थाने ग्रामीण कुटुंबांना मोठा आधार देणारी ठरेल. आता फक्त प्रतीक्षा आहे ती मोबाईलवर येणाऱ्या त्या ‘क्रेडिट’च्या मेसेजची!