Unseasonal Rain in Maharashtra | कडाक्याच्या थंडीने आता काढता पाय घेतला असून, राज्याच्या हवामानात अचानक एक मोठा ‘यू-टर्न’ पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरवणारा गारवा आता कमी झालाय आणि त्याची जागा आता उकाड्याने घ्यायला सुरुवात केली आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे मंदावले असून, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार झालं आहे.
पुणे, कोल्हापूर पट्ट्यात पावसाची शक्यता!
हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या मिलाफामुळे महाराष्ट्राच्या आकाशात ढगांची दाटी होणार आहे. याचा सर्वाधिक फटका पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे. येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला या भागात ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागातही पावसाचा शिडकावा पाहायला मिळू शकतो.
कोकणात उकाडा, विदर्भात काय परिस्थिती?
मुंबईकर आणि कोकणवासीयांना तर आता दिवसा उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. रात्रीचं तापमानही वाढल्यामुळे आता घराघरात पंखे सुसाट सुरू झालेत. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अजूनही रात्रीचा थोडा गारवा टिकून आहे, पण १८ फेब्रुवारीनंतर तिथेही उन्हाची तीव्रता वाढणार आहे. थोडक्यात सांगायचं तर, आता थंडीने शेवटच्या घटका मोजायला सुरुवात केली आहे.
बळीराजाला मोठा दिलासा!
रब्बीची पिके काढणीला आली असताना पावसाचं नाव ऐकून शेतकरी दादांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण काळजी करू नका! हा पाऊस खूप मोठा किंवा वादळी नसेल. कुठेही गारपिटीची शक्यता नसल्यामुळे पिकांचं नुकसान होणार नाही. उलट, हा हलका शिडकावा काही पिकांसाठी पूरक ठरू शकतो.
दक्षिण भारतात मात्र मुसळधार!
आपल्याकडे फक्त शिडकावा होणार असला तरी, दक्षिण भारतात मात्र पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळणार आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये १७-१८ फेब्रुवारीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील आठवड्यापासून खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू होणार आहे. त्यामुळे आता तुमचे स्वेटर, मफलर आणि उबदार कपडे कपाटात आवरून ठेवण्याची वेळ आली आहे. १८ फेब्रुवारीनंतर रात्रीचं तापमानही वाढणार असल्याने, आता उन्हाळ्याच्या तयारीला लागा!